Pune Crime : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून तरुणाला अटक
पुणे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात बुधवारी (ता. १२) पडली.
या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. तर संकेत हा दुसऱ्या एका कंपनीत खासगी नोकरीस आहे. त्यांची काही वर्षापासून मैत्रीचे संबंध होते. दरम्यान, या महिलेचा घटस्फोट झालेला पती पुन्हा तिच्या संपर्कात आला होता.
हेसुद्धा वाचा : Pune Crime: मुलाचं नवं घर पाहायला आलेल्या आईचा खून, ओळखीतील अल्पवयीन मुलानेच वृद्धेला संपवलं
संकेत म्हस्के याने काही दिवसांपूर्वी या महिलेला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला आवडते, असे म्हणून जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते, असे सांगितले. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी बर्निंग घाट परिसरात एका मित्राकडे आली होती.
त्यावेळी रिक्षातून आलेल्या संकेतने तिला अडवले. ‘तू मला का भेटत नाही? माझे “तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ शकत नाही, असे म्हणत महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात ही महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश वराळ करीत आहेत.