Ratnagiri Crime जमिनीच्या वादातून पेंडखळेच्या सरपंचावर कोयत्याने वार
राजापूर जमिनीभोवती घातलेल्या कुंपणावरून पेंडखलेचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव (५०) यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ४ जुलै) सकाळच्या सुमारास पेंडखले वठारवाडी येथे घडली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला नेण्यात आले आहे.
पेंडखले गावचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमिनीभोवती कुंपण घालण्यात आले आहे. हे कुंपण त्याच वाडीतील दत्ताराम महादेव उर्फ डी. एम. सुर्वे तोडत असताना राजेश गुरव दुचाकीवरून जात होते. आपले कुंपण तोडले जात असल्याचे त्यांनी पाहताच दुचाकी थांबवून त्यांनी दत्ताराम सुर्वे याला विचारणा केली. त्यावेळी दोघात वादावादी झाली. दरम्यान दत्ताराम सुर्वे याने हातातील कोयतीने गुरव यांच्यावर वार केला. त्यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम झाली. या हल्ल्यात ते दुचाकीसह खाली पडले. त्यानंतर सुर्वे याने कोयतीच्या विरुद्ध बाजूने गुरव यांच्या खांद्यावर मारहाण केली.
*स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज
जखमी अवस्थेतील राजेश गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीला नेण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी दत्ताराम सुर्वे याच्या • विरुद्ध राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली कोयती जप्त केली आहे. दरम्यान, दत्ताराम सुर्वे याच्या पत्नीला धक्काबुकी केल्याची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल के. एस. पाटील अधिक तपास करत आहेत..