Maharashtra Monsoon पुढील १० दिवस महत्त्वाचे, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
Maharashtra Weather Forecast by IMD: सध्या कोकणात पावसाचा जोर ओसरला असला तरी नागपूर आणि विदर्भामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात विजांचा कडकडाट वाढणार असून यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील सात ते दहा दिवसांच्या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी चू लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला
शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट वाढणार असून नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, अमरावती, या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे. विजांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
जनावरे मोकळ्या जागेत, खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी, तलाव येथे सोडू नये व धातूच्या अवजारांपासून त्यांना दूर ठेवावे. उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे. खिडक्या, दारे, न्यू विजेची उपकरणे यांच्यापासून दूर राहावे. विजा चमकत असताना शक्यतो बाहेर न फिरता पक्क्या इमारतीतच थांबावे. इलेक्ट्रॉनिक, धातूच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच विजेच्या उपकरणांचे प्लग काढून ठेवावे, असा सल्लाही दिला आहे.
तणनाशके, खतांची कामे पुढे ढकला
पुढील दहा ते बारा दिवस पावसाची शक्यता असल्याने तणनाशके वापरणे तसेच खतांचा वापर ही कामे पुढे ढकलावी. सध्याच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर ही कामे करावी, असाही सल्ला नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.